
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे नुकतीच एक दिवसीय वक्तृत्व विकास कार्यशाळा विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली. या कार्यशाळेत पुणे येथील प्रसिद्ध वक्त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी भाषणकौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील वक्ता डॉ. गंगाधर बनबरे, डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. जयश्री कापसे गावंडे, सिनेट सदस्य दिलीप चौधरी, प्रमुख उपस्थिती म्हणून संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम, सहा. प्रा. अनिरुद्ध गचके आदी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्य मार्गदर्शक डॉ. गंगाधर बनबरे यांनी विद्यार्थ्यांना वक्ता बनण्यासाठी आवश्यक गोष्टींची सविस्तर माहिती दिली. समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वक्तृत्व विकास किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भाषणाचे पाच प्रकार आणि वाचनाचे विविध प्रकार कथेच्या माध्यमातून समजावून सांगितले. ‘श्रवण करणे, वाचन करणे, चिंतन करणे, हेतू निश्चित करणे आणि स्वांत सुखाय’ या गोष्टींवर त्यांनी विशेष भर दिला.
यानंतरच्या सत्रात डॉ. जयश्री कापसे गावंडे यांनी आवाजातील चढ-उतार आणि स्पष्ट उच्चारांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर बोलताना आत्मविश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आणि विषयाचा सखोल अभ्यास करण्याचे महत्त्वही पटवून दिले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, “पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी त्यांची विविध कौशल्ये वाढवणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.”
ही कार्यशाळा सिनेट सदस्य दिलीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठाचा यापुढेही विद्यार्थ्यांसाठी अशा विविध कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम यांनी केले, तर संचालन सहायक प्राध्यापक अमोल चव्हाण यांनी केले.



