आरोग्यगोंदियाविदर्भ

मोबाइल कॅन्सर व्हॅनद्वारे १३३ नागरिकांची तपासणी

गोंदिया : कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘मोबाईल कॅन्सर व्हॅन’ने गोंदिया जिल्ह्यात मोहीम सुरू केली आहे. २६ ऑगस्ट रोजी कामठा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित तपासणी शिबिरात एकूण १३३ नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली. यात महिला व पुरुषांचा समावेश होता.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टपासून ही व्हॅन जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ३३ आरोग्य संस्थांमध्ये फिरून तपासणी करत आहे. या व्हॅनमध्ये कर्करोगाचे प्राथमिक निदान करण्याची अत्याधुनिक सुविधा आहे. कामठा येथे झालेल्या शिबिरात, एकूण १३३ लोकांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश मेश्राम यांनी सांगितले की, या तपासणीत १०१ मुख कर्करोग, १४ महिलांचा गर्भाशय कर्करोग आणि १८ महिलांचा स्तन कर्करोग संदर्भात तपासणी करण्यात आली.

या व्हॅनमध्ये एसी तपासणी कक्ष असून, मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा आणि गर्भाशय कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र उपलब्ध आहे. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तुषार डहाट व डॉ. पलाश गणवीर आणि मुखरोग तज्ज्ञ डॉ. त्रिपाठी यांनी रुग्णांची तपासणी केली. तपासणी झालेल्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

या शिबिराला सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे आणि गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे यांनी भेट देऊन अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अंकुश मेश्राम, तालुका आरोग्य सहायक आत्माराम वंजारी, तालुका पर्यवेक्षक महेश विंधालोरे, आरोग्य सहायक ढेंगे, नागपूरे, आरोग्य सेविका पी.डी. बोरकर, आरोग्य सेवक लोंढे, मेश्राम, आशा सेविका आणि इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button