४ कोटींच्या धान घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक
मुरलीधर बावणे यांच्यावरील आरोप पुन्हा चर्चेत

न्यायालयाने ३१ ऑगस्ट पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
गडचिरोली : जिल्ह्यातील देऊळगाव येथील ४ कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी महेंद्र इस्तारी मेश्राम याला कुरखेडा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. देऊळगाव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचा व्यवस्थापक असलेला मेश्राम गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. या अटकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे, कारण त्याने फरार होण्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाचे उप प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत झालेल्या धान खरेदीमध्ये गेल्या वर्षी सुमारे ४ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला होता. या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि खरेदीच्या नोंदींमध्ये फेरफार करून शासकीय निधीचा अपहार झाल्याचे समोर आले. या घोटाळ्यात मेश्राम याचा मुख्य सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या प्रकरणी मुरलीधर बावणे, दोन कर्मचारी, संस्थेच्या अध्यक्षा आणि काही संचालकांसह एकूण १७ जणांवर कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी काही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती, तर बावणे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मेश्राम यांच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील पुढील चौकशीला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मेश्राम यांनी फरार होण्यापूर्वी केलेल्या आरोपांमुळे मुरलीधर बावणे यांच्यावर संशयाचे ढग दाटले होते. मेश्रामच्या अटकेनंतर आता हे आरोप पुन्हा तपासणीच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी या अटकेला दुजोरा दिला असून, मेश्रामला आज कुरखेडा येथील प्रथम सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे धान खरेदी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक शेतकरी संघटनांनी मेश्रामच्या अटकेचे स्वागत केले आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



