नागपूरविदर्भ

स्कॉर्पिओची उभ्या ट्रकला धडक ; एकाचा मृत्यू, सात गंभीर जखमी

पोळा पाहून परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला, कन्हान-तारसा मार्गावरील घटना

नागपूर : पोळा पाहून परतणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीने कन्हान-तारसा मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात प्रज्वल रवींद्र चव्हाण (२५, रा. निमखेडा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी (२३ ऑगस्ट) मध्यरात्री २.१० वाजता वाघधरे वाडी शिवारात घडली.

वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथे पोळा पाहण्यासाठी गेलेले आठ मित्र रात्री स्कॉर्पिओने (एमएच-४२/के-८४६९) परत येत होते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने आल्यानंतर त्यांनी निमखेड्याकडे जाण्यासाठी कन्हान शहरातून तारसा मार्गावर वाहन वळवले. वाघधरे वाडीजवळ अंधार आणि वाहनाच्या वेगामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक (एमएच-४०/बीजी-०३७८) दिसला नाही. यामुळे वेगात असलेली स्कॉर्पिओ थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली.

या अपघातात प्रज्वल चव्हाण याचा मृत्यू झाला, तर चेतन वाडीभस्मे, प्रणय कडू, प्रियांश बावणे, आकाश सोनेकर, रितिक चरडे, रितीक गडे आणि प्रणय घोडेस्वार हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर प्रज्वलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button