चंद्रपूरविदर्भ

गॅस एजन्सीच्या गोदामात भीषण स्फोट ; सहा कामगार गंभीर जखमी

मूल : येथील एमआयडीसी परिसरातील संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या गोदामात मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता सिलिंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये श्रीचंद अर्जुनराम बिश्नोई (२०), श्रीराम भगीरथ बिश्नोई (३०), रमेश मोहनराम बिश्नोई (१९), महिंद्रा रामरख बिश्नोई (१९), रतीराम हनुमान बिश्नोई (२५) आणि कैलास भगीरथ बिश्नोई (२७) या राजस्थानच्या जोधपूर येथील कामगारांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गोदामात सुमारे ३०० हून अधिक गॅस सिलिंडर साठवलेले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ असतानाही गोदामात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे गोदामाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, भरलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी करत असताना हा स्फोट झाला असावा. एजन्सी अधिकृतपणे श्रीमती पटले यांच्या नावावर असली, तरी तिचे प्रत्यक्ष व्यवस्थापन सुधीर मेघराजानी यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुबोध वंजारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button