चारचाकी वाहनातून दारूची तस्करी ; दोन लाखांची विदेशी दारू जप्त

गडचिरोली : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत दारू तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून कारवाई केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून शहरात चारचाकी वाहनातून दारूची तस्करी करणाऱ्या एका दारू तस्कराला गडचिरोली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास चामोर्शी रोडवर गडचिरोली पोलिसांनी चारचाकी वाहन अडवून तब्बल दोन लाखांची विदेशी दारू पकडली.
शहर पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर मार्गावर सापळा रचला. मात्र, पोलिसांच्या नजरेत दारू तस्कर कारमधून चामोर्शी मार्गे सेमाना बायपास रोडने शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाइलने पाठलाग करून सुनील गोवर्धनदास पंजवानी (४४, रा. रामनगर, गडचिरोली) याला अटक केली. आरोपींकडून १ लाख ९८ हजार ३०० रुपये किमतीची विदेशी दारू आणि एमएच -एएच १३९४ या क्रमांकाची कार १ लाख ८० हजार रुपये किमतीचा एकूण ३ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, स्वदीप मेश्राम, अतुल भैसारे, वृषाली चव्हाण आदींनी केली.



