
धानोरा तालुक्यातील मुस्का येथील घटना
धानोरा : शेतात आपली गुरे राखत असलेल्या एका शेतकऱ्यावर झुडपात लपून बसलेल्या अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता धानोरा तालुक्यातील मुस्का येथे घडली. दामोदर चैतू गावडे (४८), रा. मुस्का, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
ते गुरुवारी सकाळी आपल्या बैलांना घेऊन शेतात गेले होते. त्याचवेळी त्यांची एक बैलजोडी जंगलाच्या दिशेने निघून गेली. त्याचा शोध घेत असतानाच, झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अस्वलाच्या तावडीतून कसाबसा सुटल्यानंतर गावडे यांनी आपल्या कुटुंबीयांना फोन करून या घटनेची माहिती दिली. बातमी गावात कळताच, गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तात्काळ धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
धानोरा येथे प्राथमिक उपचारानंतर गावडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सायंकाळी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



