
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या १६ फेब्रुवारी २०२४ च्या वाळू धोरणानुसार, भंडारा जिल्ह्यातील आठ वाळू डेपोधारकांना त्यांच्याकडील शिल्लक साठा एका महिन्यात २४ तास विक्री आणि वाहतूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हा खनिकर्म विभागाने सर्व ग्राहकांना ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत त्यांच्याकडील वाळूचा साठा उचलून घेण्याचे आवाहन केले आहे.
पांजरा रे, उमरवाडा, बेटाळा, निलज बु., गुडेगाव, शिवनाळा, इटगाव आणि नांदेड या डेपोंमधून ज्या ग्राहकांनी वाळूचे बुकिंग केले आहे, त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत वाळू घेऊन जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मुदतीनंतर जर ग्राहकांनी वाळू उचलली नाही, तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील.
जिल्हा खनिकर्म विभागाने स्पष्ट केले आहे की, मुदतीनंतर वाळू बुकिंगसाठी भरलेली रक्कम परत केली जाणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, घरकुलधारक, शासकीय बांधकाम करणारे आणि इतर बांधकाम व्यावसायिकांनी याची नोंद घेऊन वेळेत वाळू उचलून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



