
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा
मूल: प्रवाशांची मोठी अडचण लक्षात घेऊन आणि माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने मूल रेल्वेस्थानकावर ‘चेन्नई-बिलासपूर’ एक्स्प्रेसला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथील व्यापारी आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मूल हे चंद्रपूर जिल्ह्याचे मध्यवर्ती आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे तांदळाची मोठी बाजारपेठ असल्याने दररोज हजारो प्रवासी येथून ये-जा करतात. गडचिरोलीकडे जाण्यासाठी हे एक सोयीचे केंद्र असल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील प्रवासीही याच स्थानकाची निवड करतात. त्यामुळे बल्लारपूर-गोंदिया मार्गावरील हे एक वर्दळीचे स्थानक आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या दोन जलद गाड्यांचे थांबे अजूनही सुरू न झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यांना नाईलाजाने एसटी बसने प्रवास करावा लागत होता, जो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता.
ही समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक आणि व्यापारी संघाचे अध्यक्ष मोतीलाल टहलीयानी यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांकडे, यशवंतपूर-कोरबा, चेन्नई-बिलासपूर आणि दरभंगा-सिकंदराबाद या जलद गाड्यांना मूल येथे थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ३१ ऑगस्टपासून चेन्नई-बिलासपूर (१२८८९) आणि १ सप्टेंबरपासून बिलासपूर-चेन्नई (१२८९०) सुपरफास्ट एक्स्प्रेसला मूल रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बिलासपूरकडून चेन्नईकडे जाणारी गाडी दुपारी ३:५८ वाजता, तर चेन्नईकडून बिलासपूरकडे जाणारी गाडी सकाळी ६:२३ वाजता थांबणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



