
माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश ; नागरिकांना मोठा दिलासा
गडचिरोली : चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुरुड गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे आणि खडी पसरल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येची दखल माजी खासदार आणि भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी घेतली. त्यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिष पिपरे यांनी ही बाब डॉ. अशोक नेते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर डॉ. नेते यांनी सोमवारी (१ सप्टेंबर) चामोर्शीच्या दौऱ्यात स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार, आज (२ सप्टेंबर) पावसामुळे अधिकच खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दूरध्वनीद्वारे दिले.
डॉ. नेते यांच्या आदेशानंतर तात्काळ रस्त्यावर गिट्टी टाकणे, खडीकरण करणे आणि खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. या त्वरित कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉ. अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सोपा होणार आहे, असे म्हणत नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.



