
एटापल्ली येथे मुक्तीपथ तालुका समितीची बैठक संपन्न
गडचिरोली : एटापल्ली सारख्या दुर्गम तालुक्यात मलेरिया आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांमध्ये वाढ करून लोकांना आजाराबाबत माहिती द्या, असे निर्देश तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी दिले.
एटापल्ली तहसील कार्यालयात मुक्तीपथ तालुका समितीची बैठक पार पडली. यावेळी गांगुर्डे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी तीन महिन्याच्या कालावधीत मुक्तीपथने केलेल्या कामाचा आढावा सादर केला व पुढील नियोजन यावर माहिती दिली. पोलिस विभागाचे वतीने उपनिरीक्षक प्रतिक्षा बावणे यांनी दारू विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती दिली. उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक विजय बरडे यांनी बचत गटातील सदस्याचे सहकार्याने गावातील दारूबंदी करू, असे सांगितले. एनएसएस प्रमुख प्रा. राजेश हजारे यांनी कार्यक्रम राबवून जागृती करू असे सांगितले. कृषी अधिकारी अरुण वसवाडे यांनी आपले कार्यालय दारू तंबाखुमुक्त करणार असल्याचे सांगितले. तहसीलदार यांनी शाळा तंबाखुमुक्त करणे, मलेरिया जनजागृती कार्यक्रम वाढविणे, शक्तिपथ स्त्री संघटना बैठक जास्तीत जास्त कराव्यात अशा सूचना दिल्या. सोबतच शहरात अवैध दारू व तंबाखूवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.
या बैठकीला नप लिपीक एल. टी. दुर्गे, गृहपाल एस. एस. हिवाळे, तालुका उपसंघटक आकाश भोयर, शिबू कोकोडे उपस्थित होते.



