गडचिरोलीविदर्भ

स्पंदन फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिन साजरा

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव

गडचिरोली : स्पंदन फाउंडेशन, गडचिरोली यांच्या वतीने शिक्षक दिन समारंभ शहराच्या महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी माजी खासदार डॉ. नेते यांचा शाल, श्रीफळ आणि वृक्ष देऊन सत्कार केला.

याप्रसंगी बोलताना डॉ. अशोक नेते म्हणाले की, “शिक्षक दिन हा केवळ एक औपचारिक सोहळा नसून, समाजाच्या उभारणीत शिक्षकांच्या योगदानाला आदराने स्मरण करण्याचा दिवस आहे.” त्यांनी दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदराने अभिवादन केले. स्पंदन फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करताना डॉ. नेते म्हणाले, “स्पंदन फाउंडेशनने शिक्षकांचा गौरव केला, ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे. मी सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

स्पंदन फाउंडेशन ही गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एक सेवाभावी संस्था म्हणून ओळखली जाते. शैक्षणिक प्रोत्साहन, सामाजिक बांधिलकी आणि विकासात्मक कामांमध्ये ही संस्था नेहमीच अग्रेसर असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

यावेळी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, प्राचार्य मानसी गगधानी, आमदार नरोटे यांच्या पत्नी सौ. वैशाली नरोटे, ओबीसी नेते शेषराव येलेकर आणि ताजने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षक, नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button