
पाथरगोटा येथे तीन वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील युवकांनी स्वतः व्यसनमुक्त होत आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केली. मुक्तीपथ व गाव संघटनेच्या प्रयत्नातून हे शक्य झाले असून अनेक युवक आता शिक्षण व रोजगारामध्ये व्यस्त झाले आहेत.
आरमोरी तालुका मुख्यालयापासून 13 किमी अंतरावर पाथरगोटा हे गाव आहे. अवैध दारूविक्री सुरू होती तेव्हा, तीन ते चार विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या दारूमुळे गावातील लोक व युवक दारूच्या व्यसनाला लागले होते. नशेत बुडून राहणाऱ्या युवकांनी शिक्षणासह कामधंधांकडे सुद्धा दुर्लक्ष केले होते. यामुळे घरांमध्ये भांडण तंटे निर्माण होऊन गावातील विकास थांबला होता. आपण दारू पित असल्याने आपल्यासह कुटुंबाचे सुद्धा नुकसान होत असल्याची बाब लक्षात येताच युवकांनी स्वतः दारूचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला. सोबतच आपल्या गावात अवैध दारूविक्री सुद्धा होऊ नये, याकरिता मुक्तीपथ टीमला गावात पाचारण केले.
मुक्तिपथ तालुका संघटक विनोद एल.कोहपरे यांनी गावात भेट देऊन दोन दिवसीय सघन भेट कार्यक्रम राबविला. यातून मुक्तिपथ गाव संघटना स्थापन केली. विविध कृती कार्यक्रम गावामध्ये आयोजित करून युवकांच्या पुढाकारातून अवैध दारूविक्री बंद केली. मागील तीन वर्षांपासून अवैध दारुविक्री बंदी टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थ सक्रीय आहेत. गावामध्ये दारू विक्री बंद असल्याने शांतता, सुख आहे, भांडण तंटे होत नसून सुरक्षित गाव आहे. विशेष म्हणजे, मुक्तीपथ व गाव संघटनेने अनेक युवकांना सोलर प्रशिक्षणाला पाठवून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. काही युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. आता गावात आनंदाचे वातावरण असून इतरही गावांनी प्रेरणा घेऊन आपले गाव दारूविक्रीमुक्त निर्माण करण्याचे आवाहन मुक्तीपथने केले आहे.
याकरिता गाव संघटना अध्यक्ष अमर दिप बनकर, उपाध्यक्ष बबन दरवे, सचिव बघमारे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मेंद, सदस्य गणपत दरवे, शुभम दरवे, हरिहर मातेरे, विलास मेश्राम, विलास आत्राम, विनोद मेश्राम, दयानेश्वर राऊत, रामदास खरकाटे, ऋषी राऊत, लव्हाजी ठाकरे, दिवाकर प्रधान, विवेक ढोंगे, देवराव करानकर, मुक्तीपथ तालुका उपसंघटक मनिषा प्रधान यांच्यासह मुक्तिपथ गाव संघटना सदस्य यांनी परिश्रम घेतले.
मुक्तीपथ सहसंचालकांनी केली प्रशंसा
मुक्तिपथ जिल्हा सहसंचालक संतोष सावळकर यांनी गाव संघटना बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. गाव संघटन सदस्य यांनी आपला अनुभव व्यक्त केला. गावातील दारूविक्री बंद झाल्याने युवक रोजगाराला लागले आहेत. काही युवक शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून त्यांच्यासाठी गाव पुढाकारून वाचनालयाची निर्मिती करण्याचा मानस असल्याचा गावसंघटनेनी माहिती दिली. यावेळी सावळकर यांनी संघटनेचे कौतुक, प्रशंसा करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



