गडचिरोलीविदर्भ

तेंदूपत्ता कामगारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर होणार कारवाई

आलापल्ली/नागेपल्ली ग्रामपंचायतींच्या बोगस कारभाराबद्दल निवेदन

माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिला शब्द

आलापल्ली : आलापल्ली आणि नागेपल्ली येथील तेंदूपत्ता कामगारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आणि ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले आहे. सोमवारी (७ सप्टेंबर) तेंदूपत्ता कामगारांनी त्यांच्याकडे निवेदन देऊन यासंदर्भात त्वरित कारवाईची मागणी केली.

आलापल्ली आणि नागेपल्ली ग्रामपंचायतीने नियमबाह्य पद्धतीने, ग्रामसभा न घेता आणि नोंदणीकृत कंत्राटदारांना डावलून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना तेंदूपत्ता युनिट्स दिली, असा आरोप नागरिकांनी केला. तेंदूपत्ता संकलन होऊन चार महिने उलटले तरी कामगारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात कामगारांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन देऊन पैसे त्वरित देण्याची मागणी केली.

याचवेळी नागरिकांनी “हर घर नल से जल” या योजनेतील निकृष्ट कामाबद्दलही तक्रार केली. निकृष्ट कामामुळे आलापल्ली आणि नागेपल्ली शहरात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा बंद असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली.

यावेळी भाजपचे जिल्हा सचिव अभिजीत शेंडे, युवा नेते सागर बिट्टीवार, सागर कोहळे, नागेपल्लीचे शहर उपाध्यक्ष विनोद कोटरंगे, तसेच आलापल्ली व नागेपल्ली येथील नागरिक आणि तेंदूपत्ता कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अम्ब्रीशराव आत्राम यांनी कामगारांना व नागरिकांना त्यांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button