गोंदियाविदर्भ

गोंदियाच्या निखिल बहेकारची लडाखमध्ये ऐतिहासिक कामगिरी!

‘द ग्रेट हिमालयन अल्ट्रा रेस’मध्ये मिळवले दुसरे स्थान, २१ तासांत ४४४ किमीचा कठीण प्रवास पूर्ण

गोंदिया: गोंदिया शहराचा तरुण सायकलपटू निखिल बहेकार याने लडाख-लेहच्या अत्यंत कठीण आणि उंच पर्वतीय प्रदेशात आयोजित ‘द ग्रेट हिमालयन अल्ट्रा रेस सायकल’ स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून गोंदिया जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ही स्पर्धा स्पायर इंडियाने आयोजित केली होती.

‘द ग्रेट हिमालयन अल्ट्रा रेस’ ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक होती. रेसिंगचा मार्ग ४४४ किलोमीटरपेक्षा जास्त लांब होता. स्पर्धेत एकूण १३ सायकलस्वारांनी भाग घेतला होता, त्यापैकी केवळ ७ जणच ही स्पर्धा पूर्ण करू शकले. निखिलने या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत, खराब हवामान आणि थकव्यावर मात करून २१ तास ३० मिनिटांत हा प्रवास पूर्ण केला. त्याचे हे यश त्याच्या समर्पण आणि दृढ धैर्याचे प्रतीक आहे. या स्पर्धेला मेजर यशपालसिंग मोर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली होती. तर, इस्पार इंडिया पुणे येथील दिव्या टेटे यांनी निखिलला पुरस्कार देऊन सन्मानित केले.

निखिल बहेकारने यापूर्वीही लांब पल्ल्याच्या रायडिंगमध्ये सहभाग घेतला असून, ही त्याची दुसरी अल्ट्रा सायकलिंग स्पर्धा होती. तो गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे सायकलिंग करत असून, आतापर्यंत त्याने हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सायकलपटू अशोम मेश्राम, माजी सैनिक उदयभान निर्वाण, मोहित चौधरी आणि मुंबईतील आयर्न मॅन तसेच टायगर मॅन घनश्याम उके यांनी त्याचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button