
पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत वाचवले तरुणाचे प्राण
चामोर्शी : भेंडाळा परिसरात रस्ता रोको आंदोलनासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने आपले कर्तव्य बजावताना दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका तरुणाचा जीव वाचला. ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कालिदास आभारे (४२) या तरुणाने वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याला पाण्यातून बाहेर काढले.
एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली की, एका व्यक्तीने आपली चारचाकी गाडी पुलावर लावून नदीपात्रात उडी मारली. माहिती मिळताच उपनिरीक्षक गणेश जंगले आणि विशाल नल्लावर यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी तात्काळ एक डोंगा पाण्यात उतरवला आणि शोधमोहीम सुरू केली. नदीच्या प्रचंड प्रवाहामध्ये कालिदास आभारे वाहून जात होते. उपनिरीक्षक जंगले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता डोंगा प्रवाहाच्या दिशेने नेला. याचवेळी आभारे यांचा हात सुटला आणि ते वेगाने वाहून जाऊ लागले. मात्र, जंगले आणि त्यांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि सुरक्षितपणे डोंग्यात आणले. या बचावकार्यात ढिवर समाजाचे निलेश महादेव शेंड आणि हरीदास ढिवरू मानकर यांनीही पोलिसांना मदत केली.
कालिदास आभारे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, यामागचे कारण पोलीस शोधत आहेत. यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांकडेही चौकशी सुरू आहे.



