
डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे माजी आ. गजबे यांचे आवाहन
देसाईगंज (वडसा): देसाईगंज (वडसा) फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मंगळवार, १० सप्टेंबर रोजी ‘फोटोशॉप आणि AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)’ या विषयावर एका दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. लाखांदूर रोड येथील हटवार मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा फोटोग्राफी व्यवसायात कसा उपयोग करावा, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी डिजिटल युगात फोटोग्राफीचे महत्त्व अधोरेखित केले. स्थानिक फोटोग्राफर्सनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवसायात नवीन यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जुने फोटोग्राफर पूर्णचंद्र सहारे, तेजस्वी फोटो स्टुडिओ आणि अतुल मने यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेत प्रसिद्ध फोटोशॉप एक्सपर्ट प्रवीण बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी फोटो एडिटिंग, कलर ग्रेडिंग, मार्केट-ट्रेंडिंग पोस्टर डिझाइन आणि AI चा फोटोग्राफीमध्ये उपयोग कसा करावा, यावर सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेमुळे उपस्थित फोटोग्राफर्सना डिजिटल फोटोग्राफी आणि मार्केटिंगचे ज्ञान मिळाले, तसेच अल्बम तयार करण्याचे नवीन ट्रेंड्स आणि AI च्या वापरावरही चर्चा झाली.
या कार्यक्रमाला वडसा फोटोग्राफर असोसिएशनचे संदेश वाघमारे, राजेश कोल्हे, मनीष करंबे, किशोर सरकार, शेखर बनकर, ईश्वर दुफारे, अतुल खरकाटे, पुरुषोत्तम कार, शुभम डिब्बे, नवाब शेख, डिंपल बडोले, तुषार मैंद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेचे स्वागत केले व फोटोग्राफी क्षेत्रातील नवकल्पना आत्मसात केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.



