
रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन
कुरखेडा : कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून डायलिसिस केंद्र सुरू न झाल्याने रुग्णांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या (आप) गडचिरोली जिल्हा शाखेने आवाज उठवला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी १० सप्टेंबर रोजी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके यांना निवेदन सादर करून ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कुरखेडा आणि कोरची तालुक्यातील रुग्णांना डायलिसिससाठी गडचिरोली किंवा चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथे जावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, डायलिसिस सेवेसाठीची भव्य इमारत एक वर्षापूर्वीच बांधून पूर्ण झाली आहे, तरीही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. या प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे स्थानिक रुग्णांना तात्काळ दिलासा देण्यासाठी ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी पक्षाने केली.
यावेळी बोलताना जिल्हा संघटनमंत्री ताहीर शेख म्हणाले, “रुग्णांचे आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचे आहे. आम्ही प्रशासनाकडे या मागणीचा सतत पाठपुरावा करत राहू. रुग्णांना न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही.”
याप्रसंगी पक्षाचे सहसंघटनमंत्री चेतन गहाणे, कोषाध्यक्ष इरफान पठाण, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आणि कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार उपस्थित होते. ‘आप’च्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, आता प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



