
कोरचीत एक दिवसीय धरणे आंदोलन ; १२ सप्टेंबरपासून कोराडीत बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
कोरची : विदर्भ महसूल सेवक संघटना, कोरची तालुक्याच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्यास १२ सप्टेंबरपासून कोराडी येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा महसूल सेवक (कोतवाल) शासनाचा कणा आहे. महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना शासन स्तरापासून गाव पातळीवरील योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या योजना इत्यादी अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते. महसूल विभाग राज्य शासनाच्या क्षेत्रीय योजना राबविणारा सर्वात प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबर विविध प्रमाणपत्र देणे, कृषी गटांना शासनाच्या विविध योजना अभियाना मोहिमांचे समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका, राज्य शिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्र देणे अशा अनेक बिगर महसुली कर्मचारी जबाबदारी महसूल विभागात असते. त्याअर्थी सर्वसामान्य जनतेचा दैनंदिन गरजाची निगडित असलेल्या आणि त्यामुळे शासनची प्रतिमा प्रतिबिंब करणारा हा विभाग आहे.
क्षेत्रीय स्तरावर तलाठी साजा तसेच वरिष्ठ महसूल कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असतो. परंतु शासनाने अद्याप पर्यंत महसूल सेवक कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेले नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे. महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) यांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा, चतुर्थ श्रेणीच्या दर्जा देण्याच्या मागणीसाठी टप्प्याटप्प्याने सर्व महसूल सेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
कोरचीतील एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुकेलसिंग काटेंगे, उपाध्यक्ष निरंजन मडावी, सल्लागार सादाराम मडावी, सचिव अनिल सहारे, संजय मडावी, चंद्रशेखर करमकार, विजय मडावी, वीरेंद्र कोराम, कुवरसिंग कोरेटी, देवराम हेडामी, तारा सिंध्राम, कुंदा कोरेटी, नीलम टेकाम, मालती ताडामी, लसंत्री काटेंगे, सुरेश नंदेश्वर, परदुराम काटेंगे, मुकेश राहुल, शिवलाल कल्लो, गुलशन जमकातन, सेवकराम तुलावी, रवींद्र हलामी, नीलिमा कोरचा, मोनिका हलामी, सरिता मडावी, खुशाली रक्षा आदी उपस्थित होते.



