
उमरेड फाट्याजवळ ट्रकची जोरदार धडक ; खासदार थोडक्यात बचावले
भंडारा : भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर गाडीला (एमएच ३६ – एपी ९९११) गुरुवारी पहाटे ६ वाजता नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
खासदार डॉ. पडोळे हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली येथे मतदान करून मुंबईमार्गे आपल्या गावी परत येत होते. पहाटेच्या सुमारास नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या एका वाहनामुळे त्यांच्या चालकाने नियंत्रण गमावले. त्यामुळे त्यांची गाडी असंतुलित होऊन एका ट्रकवर आदळली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, खा. डॉ. पडोळे यांच्यासह सर्व सहकारी सुखरूप बचावले आहेत.
भंडारा-गोंदियाचा बराचसा भाग नक्षलप्रभावित असतानाही, खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. याबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने आता या अपघातानंतर सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



