
वडेगाव येथील घटना ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कुरखेडा : तालुक्यातील वडेगाव येथील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१२ सप्टेंबर) दुपारी घडली. चैताली प्रल्हाद बोरकर (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
चैताली कुरखेडा येथील विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात ११वी विज्ञान शाखेत शिकत होती. दुपारच्या सुमारास तिने घराजवळील जुन्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तिला तातडीने खाली उतरवून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणाची नोंद कुरखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.



