आरोग्यगडचिरोलीविदर्भ

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान ; महिलांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरे

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान तपासणी, मार्गदर्शन व सरकारी योजनांचा लाभ मिळणार

गडचिरोली : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत, गडचिरोली जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरांमध्ये महिलांना एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवल्या जातील. यामध्ये विस्तृत तपासणी: उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगाची तपासणी. इतर आरोग्य चाचण्या: रक्तक्षय (अ‍ॅनिमिया), क्षयरोग व सिकल सेल तपासणी. गर्भवती महिलांसाठी सेवा: प्रसूतीपूर्व काळजी (ANC), माता व बाल संरक्षण कार्ड वितरण आणि लसीकरण. आदींचा समावेश आहे. या अभियानामध्ये आरोग्य तपासणीसोबतच महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमही आयोजित केले आहेत. महिलांना पोषण, मासिक पाळीची स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले जाईल. तसेच, मानसिक आरोग्याविषयी समुपदेशन, रक्तदान शिबिरे, आणि आयुष्मान भारत व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी (PM-JAY) नोंदणीची सुविधाही उपलब्ध असेल.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी सांगितले की, घरोघरी जाऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या शिबिरांबद्दल जनजागृती केली जाईल.

१२ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. महिलांनी मोठ्या संख्येने शिबिरात हजेरी लावून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले त्यांनी केले. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. नोडल अधिकारी डॉ. स्मिता साळवे, डॉ. प्रेरणा देवतळे यांनी जिल्ह्यातील शिबिराचे नियोजन केले आहे.

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी सजग करण्याचे व त्यांना सशक्त बनविण्याचे महत्त्वाचे साधन ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले, तसेच स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सर्व महिलांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button