
नागरिकांच्या समस्यांचे एकाच छताखाली होणार निराकरण
कोरची : तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. कोरची येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात सकाळी ११ वाजता हा जनता दरबार सुरू होईल.
या ‘जनता दरबारा’त विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या समस्या आणि तक्रारी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांचे त्वरित निराकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी केले आहे.



