
अतिक्रमण केलेल्या डुक्करपालक आणि ग्रामस्थांमध्ये वाद विकोपाला ; चौघांना अटक
अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथील सार्वजनिक स्मशानभूमीवर पुन्हा एकदा अतिक्रमण केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कारावेळी डुक्करपालक आणि गुरूनुले कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नागेपल्ली ग्रामपंचायतीने सुमारे वर्षाभरापूर्वी या स्मशानभूमीवरील डुक्करपालन हटवले होते. मात्र, डुक्करपालकांनी पुन्हा त्याच जागेवर अवैधपणे अतिक्रमण केले होते. काल सायंकाळी गुरूनुले कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय अंत्यविधीसाठी आरक्षित स्मशानभूमीत गेले. यावेळी डुक्करपालकांनी त्यांना विरोध केला, ज्यामुळे दोन्ही गटांत जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांतील सात ते आठ जणांनी परस्परांना मारहाण केली. या झटापटीत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण ग्रामपंचायत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नागेपल्ली ग्रामपंचायतीने ही स्मशानभूमी सार्वजनिक असून ती अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.



