
केळीवेळी (अकोला) येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान नियम बदलून विशिष्ट संघाला ‘चाल‘ दिल्याची तक्रार ; खेळाडूंकडून पोलिसात जाण्याची तयारी
गडचिरोली : अकोला जिल्ह्यातील केळीवेळी येथे ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित ५२ व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील आयोजनावर गंभीर अनियमितता आणि नियमबाह्यतेचा आरोप गडचिरोली जिल्ह्याच्या खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. स्पर्धा समितीने हेतुपुरस्सर नियम मोडून गडचिरोलीच्या मुला-मुलींच्या संघाला राष्ट्रीय स्तरावर जाण्यापासून वंचित ठेवले, असा दावा करण्यात आला आहे.
मुलींच्या विभागात गडचिरोली संघाने ‘ड-गटात’ अमरावती शहर, चंद्रपूर ग्रामीण आणि गोंदिया या संघांवर मात करत विजेतेपद पटकावले होते. मात्र, बाद फेरीतील सामन्यांच्या नियोजनात अनियमितता आढळली. नियमानुसार ‘ड-गट विजेता विरुद्ध अ-गट उपविजेता’ असा सामना होणे आवश्यक असताना, स्पर्धा समितीने नियम बदलून गडचिरोलीचा सामना थेट ‘अ-गट विजेता नागपूर शहराशी’ लावला. याचवेळी, ‘अ-गटातील’ दोन्ही सामने हरलेल्या अकोला ग्रामीण विरुद्ध उपविजेता अमरावती शहर असा सामना घेण्यात आला, ज्यामुळे स्पर्धेची पारदर्शकता धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. अमरावतीला पुढे चाल देण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलांच्या विभागातही गडचिरोलीच्या संघाला राष्ट्रीय स्तरावर जाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. या गटात केवळ पाच-पाच मिनिटांचे सामने घेऊन अमरावती ग्रामीण आणि अमरावती शहर या संघांना पुढे ‘चाल’ देण्यात आली. यापूर्वी बल्लारपूर-अकोला येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेतही याच प्रकारे दबाव टाकून नियमबाह्य सामने घेतल्याची तक्रार गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी नोंदवली होती. निवड समिती सदस्य विनायक माळी यांनी कोच आणि मॅनेजरवर अमरावतीला पुढे चाल देण्याचा दबाव टाकल्याचेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
स्पर्धा निरिक्षकांशी याबाबत चर्चा केली असता, “आम्हाला वरून ज्या सूचना येतात, त्यानुसार सामने घेतो, आम्ही काही करू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केल्याचे उपस्थितांनी सांगितले. या प्रकारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, हे प्रकरण पोलीस विभागाकडे देऊन न्याय प्रविष्ट करण्याची तयारी सुरू आहे. खेळाडू सध्या मानसिक ताणात असून, त्यांच्याकडून काही अनैतिक कृती घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्पर्धा समितीवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या अन्यायाबाबतचा सविस्तर अहवाल गडचिरोली जिल्ह्याचे आमदार, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या क्रीडा मंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला आषिश विश्वास, दिव्यांनी निसार, तृणल पुडो, वैभव नरोटे, आकाश नंदावार, प्रशांत कोटगले, चंदन कांबळे, पीयूष चिंचघरे, रोहित कल्लो, आदित्य दोडके, मोहित मेश्राम, निलेश कावळे, भावेश भोयर, आर्यन सालोरकर, रिया किचाकी, प्रलव तुलावी, रक्षा मेश्राम, जयश्री उईनवार, विद्या राणा, प्रगती गेडाम, ज्ञानेश्वरी गंडाटे, कल्याणी विनायके, नागेश्वर मल्लेवार, अपेक्षा आरेवार, गीतांजली चौधरी, सायली भांडवले, सपना बांगरे, समीक्षा सहारे, खुशबू नैताम, अगस्ती रोडे, अजय कावळे, ज्ञानेश्वर कारकाडे, कार्तिक जमाने, रोहेल गुरुनुले, कुणाल देशमुख, पवन भोयर, साहिल जराते, नयन राऊत आणि सुरेंद्र उसेंडी उपस्थित होते.



