
गडचिरोली : तालुक्यातील मुरूमबोडी येथील दारूविक्रीचा परिणाम विविध गावातील लोकांना सोसावे लागत आहे. यातून मुक्त होण्यासाठी भिकारमौशी ग्रामसभेत दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामपंचायत पदाधिकारी पुढाकार घेणार आहेत.
भिकारमौशी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मुरूमबोडी येथे अवैध दारू विक्री सोबतच विविध गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा केली जाते. या गावामुळे दारूविक्री बंद असलेल्या आजू बाजूच्या गावात परिणाम दिसून येत आहे. मुरुमबोडी येथे दारू पिण्यासाठी मध्यपी लोकांची नेहमीच वर्दळ असते. परिणामी इतर गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. परिसरात आरोग्य, अपघात, आर्थिक नुकसान अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. भिकारमौशी गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद असल्याने शांतता व सुव्यवस्था टिकून आहे. परंतु, नजीकच्या मुरूमबोडी गावामुळे व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संबंधित गावाची दारूविक्री थांबविण्यासाठी ग्रामसभेत निर्णय घेण्यात आले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत दारू विक्रेत्यांना दाखले देणार नाही, पोलीस विभागाला दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, आजूबाजूचे प्रति गावातील किमान 5 सदस्य दारू बंदीसाठी निवड करणे, प्रत्येक आठवड्यात मुरूमबोडी येथील दारूविक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी मोह सडवा, दारू नष्ट करणे व पोलीस विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करणे असे ठरवण्यात आले. सभेत मुक्तीपथ तालुका संघटक रेवनाथ मेश्राम यांनी मार्गदर्शन करीत एकीतून अवैध दारू हद्दपार करणे शक्य असल्याची बाब पटवून दिली.
यावेळी सरपंच लता मडावी, तंटामुक्त अध्यक्ष सुरुदास भैसारे, पोलीस पाटील स्नेहल गेडाम, पोलीस पाटील हरिचंद्र खंडारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गुरूनुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.



