गोंदियाविदर्भ

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेत महिलांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी – जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे आवाहन

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात अभियान; महिला आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष

गोंदिया : महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सर्व वयोगटातील महिला, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना आपल्या आरोग्याची मोफत तपासणी जवळच्या आरोग्य केंद्रात करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आजच्या वेगवान जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जंक फूड, अपुरा आहार, अपुरी झोप आणि कामाचा ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर उपाय म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे महिलांची आरोग्य तपासणी: उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा, स्तनांचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तसेच क्षयरोग व ॲनिमियाची तपासणी केली जाईल. माता आणि बाल आरोग्य: गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि बालकांचे लसीकरण केले जाईल. आयुष सेवा: आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि इतर पर्यायी उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्या जातील.

या अभियानांतर्गत मासिक पाळीची स्वच्छता, पोषण आणि निरोगी राहण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच, १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन साजरा केला जाणार असून, १ लाख युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी महिलांना पौष्टिक आहार घेण्याचा आणि पुरेसा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जिल्हाधिकारी नायर यांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपले आरोग्य सुरक्षित आहे का, याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button