गडचिरोली पोलिसांच्या श्वान ‘सारा’ची सोनेरी कामगिरी; राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पटकावले सुवर्णपदक

गडचिरोली : गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि वाढत्या शहरीकरणामुळे पोलिसांना अधिक दक्ष राहावे लागते. या पार्श्वभूमीवर, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या २०व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलातील श्वान ‘सारा’ हिने चमकदार कामगिरी केली आहे. श्वान पथक स्पर्धेतील ‘गुन्हे शोधक’ प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावून गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
राज्यातील पोलिसांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि कौशल्ये वाढवण्यासाठी १५ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २५ विविध विभागांनी सहभाग घेतला होता. सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अँटी सॅबोटेज चेक आणि श्वान पथक अशा अनेक स्पर्धा यात घेण्यात आल्या.
या सर्व स्पर्धांमध्ये लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन तज्ञांनी मूल्यमापन केले. ‘सारा’ने ‘गुन्हे शोधक’ प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. या कामगिरीमुळे तिची नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा श्वान स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे.
या यशाबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी श्वान पथक प्रभारी अधिकारी ओमप्रकाश बोरेवार, श्वान हस्तक पोलीस हवालदार राजेंद्र कौशिक आणि पोलीस हवालदार अर्जुन परकीवार यांचे अभिनंदन केले. त्यांनी ‘सारा’चे कौतुक करत भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याची शुभेच्छा दिल्या.



