भंडाराविदर्भ

जिल्ह्यातील विद्यार्थी देणार रमण सायन्स सेंटर व इस्त्रोला भेट

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची संकल्पना ; गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळ्यात केले सुतोवाच

भंडारा : जिल्ह्यातील विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणारे व त्यातून जिल्हा तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना रमण सायन्स सेंटर, इस्त्रो व नासासारख्या संस्थाची शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात येईल, असे सुतोवाच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग डॉ. पंकज भोयर यांनी केले.

जिल्हा परिषद भंडारा व शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभ तसेच फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अखिल सभागृह गणेशपूर, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार सुनिल मेंढे, जि.प. चे पदाधिकारी नरेश इश्वरकर, शितल राऊत, आनंद मलेवार, अनिता नलगोपुलवार, रसिका रंगारी, गटनेता विनोद बांते, संदीप ताले, यशवंत सोनकुसरे, दिलीप सार्वे, गजानन निरगुडे, कल्पना कुर्जेकर, नागेश भगत, सुषमा पारधी, लता नरुले,  यांच्यासह जिल्हाधिकारी सावनकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, प्राचार्य डाएट राजेश रुद्राकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या तालुकास्तर व जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वाकांक्षी व प्रेरणादायी उपक्रम असून त्यातून भावी वैज्ञानिकांची पायाभरणी भंडारा जिल्ह्यातून होईल. असा आत्मविश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात सर्वांच्या सहयोगाने चांगले काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सोडविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

नुकताच राज्य शासनाकडून 114 कोटीचा निधी भंडारा जिल्हयाला प्राप्त असून तो लवकरच धान उत्पादकांना वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या क्षेत्रभेटीमध्ये सात तालुका स्तरावरून प्रथम 21 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सी.व्ही. रमण सेंटर, नागपूर येथे तर जिल्हा प्रदर्शनात उत्कृष्ट 51 विद्यार्थ्यांना इस्त्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगलोर येथे तसेच राज्य स्तरावरील 51 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना नासा संस्था, अमेरीका येथे क्षेत्रभेटीला नेण्यात येईल. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बेंगळूरु येथे विद्यार्थ्यांना विमानाने नेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संधी, संशोधनाची दिशा आणि वैज्ञानिकांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेण्यास सक्षम होणार आहेत.

या उपक्रमासाठीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे. या उपक्रमाचा संशोधक वृत्ती, आत्मविश्वास, जिज्ञासावृती आणि तंत्रज्ञानाकडे आकर्षण निर्माण करणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थेट संशोधन संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख होणार असून भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधन  घडविण्याच्या दृष्टीने ही क्षेत्रभेट असून, भविष्यातील वैज्ञानिक आणि एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. सदर क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड ही तालुका व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी घेणार आहे. झालेल्या विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये अनमोल केवळराम रंगारी, रामकृष्ण मदन चाचेरे, गौरीशंकर यशवंत वासनिक, नरेंद्र नत्थूराम चौधरी, नंदलाल तुळशिराम बिलवणे, डॉ. चोपराम लक्ष्मण गडपायले, ज्ञानेश्वर हेमराज मेंढे, गोपाल मंगू राठोड, आणि सौ. आभा चंद्रकुमार नंदनवार यांचा समावेश होता. या शिक्षकांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगला गोतारणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ठवकर आणि महेश जगनिक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button