गोंदियाविदर्भ

 ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सालेकसा येथे कर्करोग तपासणी शिबिर

११९ लाभार्थ्यांची तपासणी ; आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा

गोंदिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात ११९ लाभार्थ्यांनी मोबाइल कॅन्सर व्हॅनद्वारे आपली मोफत तपासणी करून घेतली.

हा उपक्रम महिलांच्या आरोग्यावर आणि सक्षमीकरणावर भर देतो, जे कुटुंब आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे आणि नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाइल तपासणी व्हॅनचा वापर करत शिबिरे आयोजित केली आहेत. या व्हॅनद्वारे शहरांसह ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांची तपासणी केली जात आहे.

सालेकसा येथील शिबिरात ११९ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात: ६२ मुख कर्करोगाचे रुग्ण, ३० महिलांची स्तन कर्करोगाची तपासणी, २७ महिलांची गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती जयस्वाल यांनी ही माहिती दिली. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. यशस्वी भाटकर, मुखरोग तज्ज्ञ डॉ. राजेश त्रिपाठी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button