
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तहसीलअंतर्गत वडलापेठ येथील सुरजागढ इस्पात प्रा.लि.चे बुधवारी (दि.१७ जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील डझनभर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव उद्घाटन पत्रिकेमध्ये छापण्यात आले आहे. या प्रकल्पाबाबत जनसुनावणी झाली नसून पर्यावरण विभागाची मंजुरीसुद्धा मिळाली नाही. त्यामुळे नियमांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
३५० एकर जमिनीवर ग्रीन फील्ड स्टील प्लांट उभारण्यात येणार असल्याचा दावा सुरजागढ इस्पात प्रा. लि.ने केला आहे. यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून ७ हजार नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांनी २५० एकर जमीन कंपनीला दान दिल्याचा दावा केला होता. मात्र, ही जमीन कंपनीच्या नावाने झालीच नसून यासंदर्भात प्रक्रिया आजही सुरूच आहे. ही जमीन आदिवासींची आहे. यासंदर्भातील मौका चौकशीचा अहवाल १२-१३ जुलै रोजी एसडीओंना पाठविला. अद्याप त्यावर समोरील कारवाई सुरू आहे. या जमीन हस्तांतरणाला शासनाची मंजुरी मिळाली नसल्याची माहिती महसूल निरीक्षक भूषण जवंजाळकर यांनी दिली. एवढेच नाही तर आदिवासींची २५० एकर जमीन देण्याचा दावा आत्राम यांनी केला आहे. ती जमीन त्यांची एकट्याची नसून जो सर्व्हे अहवाल मागितला आहे, ती १७ ते १८ नागरिकांची आहे. यातील काही जमीन आत्राम कुटुंबातील सदस्यांची असून अन्य जमीन इतरांच्या नावाची आहे. या जमिनीचे शेतकऱ्यांकडून अधिग्रहण करण्यात आले नसून ती कंपनीला हस्तांतरित सुद्धा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
कंपनीचा दावा
सूरजागढ इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे १.६ एमटीपीए बेनिफिकेशन यंत्र, १.२ एमटीपीए पेलेट प्लांट आणि ६५० टीपीडीचे ४ स्पंज आयरन प्लांट स्थापन करण्याचा दावा कंपनीने गडचिरोली येथे केला आहे. यामध्ये इंडक्शन फर्नेस (०.७५) एमटीपीए, रोलिंग मिल (०.७५ एमटीपीए) आणि १२० मेगावॉट क्षमतेचे कॅप्टिव्ह पॉवर प्लांटचे काम २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भविष्यात एकात्मिक स्टील प्लॉटची क्षमता २ मिलियन टन प्रति वर्ष करण्याची योजनाही कंपनीने आखली आहे.



