
चंद्रपूर: जिल्हा पुनर्वसन प्रशासकीय भवन कार्यालय, चंद्रपूर येथील सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबा खांडेकर यांना २८ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या प्रमाणपत्र अहवालासाठी खांडेकर यांनी ही लाच मागितली होती.
या प्रकरणातील तक्रारदार हे चंद्रपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या आईची भद्रावती येथील मालमत्ता औष्णिक विद्युत केंद्रासाठी अधिग्रहित झाली होती, त्यामुळे तक्रारदाराच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून नामनिर्देशित करण्यात आले होते. तक्रारदाराच्या मुलीची महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितच्या परीक्षेत ‘कनिष्ठ अभियंता’ या पदासाठी प्रकल्पग्रस्त कोट्यातून निवड झाली होती. यासाठी आवश्यक असलेला अहवाल पाठवण्यासाठी सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने जुलै २०२५ मध्ये खांडेकर यांना १ लाख रुपये दिले होते. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी तक्रारदाराने अहवालाबाबत विचारणा केली असता, खांडेकर यांनी उर्वरित ३० हजार रुपये देण्याची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचून प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील कार्यालयात नरेंद्र विठोबा खांडेकर यांना ३० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले.



