
आमगाव येथील घटना ; निकालानंतर मानसिक तणावात होता विद्यार्थी
गोंदिया : बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आमगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याने अपयशामुळे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बुधवार, ७ मे रोजी आमगाव शहरातील बजरंग चौक/दुर्गा चौक परिसरात घडली. कृष्णा धरम शिवनकर (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे ला कृष्णाचा १८ वा वाढदिवस होता. मात्र, त्याने बारावीत अनुत्तीर्ण झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे शिवनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि कृष्णाचा गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, आमगाव येथे पाठवला. पोलिसांनी पंचनामा करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील एकूण १०६७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास झाले होते, आणि कृष्णा हा त्यापैकीच एक होता. अपेक्षित निकाल न लागल्याने तो सोमवारपासूनच मानसिक तणावात होता, अशी माहिती आमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिली. ते म्हणाले की, कृष्णा निकालानंतर मानसिक तणावात होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेने आमगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.



