गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जागतिक युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आढावा ; पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट

गडचिरोली : मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपियन खंडातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल आणि एल.पी.जी. (LPG) गॅस साठ्याचा सविस्तर आढावा घेतला आहे. जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), इंडियन ऑईल (IOCL) आणि रिलायन्स पेट्रोलियम या प्रमुख तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी प्रशासनाने चर्चा केली आहे. या कंपन्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, वंगण (Lubricants) आणि घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिकृतपणे दिली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि तेल कंपन्यांच्या समन्वयातून इंधन साठ्यावर दररोज लक्ष ठेवण्यात येत आहे. जागतिक स्तरावर घडामोडी घडत असल्या तरी स्थानिक स्तरावर त्याचा कोणताही विपरित परिणाम सध्या जाणवणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

अफवांपासून सावध राहा: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी टाळा: गरजेनुसारच इंधन खरेदी करा, अनावश्यक साठा टाळा. प्रशासनाला सहकार्य करा: कोणत्याही पेट्रोल पंपावर गैरप्रकार आढळल्यास जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.

“गडचिरोली जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अनावश्यक साठा करण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नका, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.”

— सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button