
गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्सचा ऐतिहासिक पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळणार थेट विदेशी विद्यापीठांत शिक्षणाची संधी
गडचिरोली : गडचिरोली सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंत युवकांना आता जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण जिल्ह्यातच मिळणार आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि मेसर्स लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात आलेल्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ (UIT), गडचिरोलीचे भव्य उद्घाटन शनिवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अडपल्ली येथे संपन्न होणार आहे.
या तंत्रज्ञान संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू युवकांच्या तांत्रिक कौशल्य विकासासाठी आणि त्यांना जागतिक बाजारपेठेतील रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, विशेष अतिथी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार रामदास मसराम, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चे लेफ्टनंट कर्नल विक्रम मेहता, कार्यकारी संचालक व्यंकटेश सौंदर्यराजन, निवासी संचालक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड हिम्मत सिंग बेदला, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक मिळवून देणारी खेळाडू आणि युथ पॅरा गेम्स (दुबई) मधील विजेती कु. श्वेता कोवे हिचा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.
“ही तंत्रज्ञान संस्था केवळ एक इमारत नसून ती गडचिरोलीतील युवकांसाठी प्रगतीचे प्रवेशद्वार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.” असे आवाहन डॉ. अनिल हिरेखण (कुलसचिव) व प्रा. मनिष उत्तरवार (प्रभारी संचालक, युआयटी) यांनी केले आहे.



