
कटेझरी-मर्मा जंगल परिसरात कारवाई ; स्मारकांच्या ठिकाणी वृक्षारोपण करून शांततेचा संदेश
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने प्रभावी माओवादविरोधी अभियान राबवत, येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या माओवाद्यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का दिला आहे. पोस्टे कटेझरी हद्दीतील मौजा कटेझरी आणि मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले दोन ते तीन वर्षांपूर्वीचे स्मारक सुरक्षा दलातील जवानांनी ३० सप्टेंबर रोजी उद्ध्वस्त केले.
गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या सातत्यपूर्ण अभियानांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात माओवाद्यांविषयीची भीती कमी होताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून, माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेले हे दोन जुने स्मारक नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली.
३० सप्टेंबर रोजी पोस्टे कटेझरी येथील पोलीस पथक आणि एसआरपीएफच्या जवानांनी जंगल परिसरात शोध अभियान राबवले. यावेळी दोन्ही माओवादी स्मारक दिसून आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस (BDDS) पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही स्मारके पाडून उद्ध्वस्त करण्यात आली. स्मारके उद्ध्वस्त केल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पोलीस पथकाने उपस्थित नागरिकांना माओवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करून गावाचा विकास करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील आहे. माओवाद्यांच्या अशा स्मारकाला समाजात कुठेच स्थान नाही. कोणीही अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये सहभागी होऊ नये.”
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक आणि गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले, एसआरपीएफ गट ११ चे पोउपनि. कुणाल भारती तसेच पोस्टे कटेझरीचे पोलीस अंमलदार व एसआरपीएफचे जवान यांनी पार पाडली.



