
गोरेगाव तालुक्यात नवरात्रोत्सवात आरोग्य विभागातर्फे यात्रेकरूंसाठी विशेष शिबिर
गोंदिया : संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना, गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी येथे लाखो भाविक दर्शनासाठी भेट देत आहेत. या यात्रेकरूंना आरोग्यविषयक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), तिगाव यांच्यातर्फे मांडोदेवी संस्थानच्या परिसरात आरोग्य शिबिर व जनजागृती स्टॉल लावण्यात आला आहे.
२६ सप्टेंबर रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सुर्यादेव मांडोदेवी संस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तिगावच्या आरोग्य शिबिराला भेट दिली आणि स्वतः विविध आरोग्य विषयक योजनांची जनजागृती केली. पुरवण्यात येत असलेल्या आरोग्य सेवांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद सदस्य उषा मेंढे (माजी अध्यक्ष जि.प. गोंदिया व अध्यक्ष जन आरोग्य समिती, तिगाव) यांनीही शिबिराला भेट देऊन जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेतला.

प्राथमिक आरोग्य केंद्र तिगावचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमकुमार बघेले यांनी याप्रसंगी माहिती दिली की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरजू यात्रेकरू रुग्णांना आवश्यक प्रथमोपचार दिले जात आहेत. तसेच, साथरोग व जलजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी पाण्याची तपासणी (OT) आणि पाणी साठ्याचे क्लोरीनेशन करण्यात येत आहे.
या शिबिरात प्रतिबंधात्मक उपचार: मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या असांसर्गिक आजारांवर मार्गदर्शन. किटकजन्य आजार: हिवताप (मलेरिया), डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती. शासकीय योजना: प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी सुरक्षा कार्यक्रम, आयुष्मान भारत (आभा कार्ड) आणि मानव विकास कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ. प्रेमकुमार बघेले, डॉ. रूपल बिसेन, सामुदायिक आरोग्य अधिकारी मयुरी शिवणकर, औषध निर्माण अधिकारी अंजू कांबळे तसेच आरोग्य सेवक, सेविका आणि आशा कर्मचारी उपस्थित होते.



