भंडाराविदर्भ

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

तुमसर तालुक्यातील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

तुमसर : तालुक्यातील चिंचोली येथील खुनासह अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी त्याला एका प्रकरणात न्यायालयात हजर (पेशी) राहायचे होते, त्याच दिवशी त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. सचिन उर्फ चिता धुर्वे (वय ३३) असे त्याचे नाव आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सकाळी अंघोळ करून तयार झाला. त्याने गावातील मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. घरी परतल्यानंतर त्याने थेट छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन उर्फ चिता धुर्वे हा खुनासह अनेक गुन्हेगारी खटले दाखल असलेला आरोपी होता. महत्त्वाचे म्हणजे, एका प्रकरणात त्याला गुरुवारी न्यायालयात हजर राहायचे होते. घटनेच्या वेळी त्याची आई आणि बहीण स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या. थोड्या वेळाने आई समोरच्या खोलीत आली असता, तिने आपल्या मुलाला फासावर लटकलेले पाहून आरडाओरड केली. ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि न्यायालयात हजर राहण्याची तारीख असताना केलेल्या या आत्महत्येमागील नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button