गडचिरोलीविदर्भ

विषारी पावडर प्राशन केल्याने सी-६० जवानाच्या पत्नीचा मृत्यू

महाराष्ट्र दिनी घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ

गडचिरोली : गडचिरोली शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय विवाहितेचा विषारी पावडर प्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १ मे रोजी घडली. सोनाली रवींद्र उसेंडी असे मृत महिलेचे नाव असून, त्या नक्षलविरोधी मोहिमेतील ‘सी-६०’ दलाचे जवान रवींद्र उसेंडी यांच्या पत्नी होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली उसेंडी यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरी तांदळात टाकण्याची पावडर पाण्यात मिसळून प्राशन केली. काही वेळातच त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलवले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी सामान्य रुग्णालयात धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेहाचे उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. सध्या फिर्यादी व नातेवाईकांच्या जबाबावरून गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सोनाली उसेंडी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस विविध अंगांनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एका कर्तव्यावर असलेल्या जवानाच्या पत्नीचा अशा प्रकारे अंत झाल्याने गणेशनगर परिसरात आणि पोलीस वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button