गडचिरोलीविदर्भ

“महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

ग्रामीण रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार डायलिसिस सेवा; वेळ, खर्च व हालअपेष्टा कमी होणार

गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस – स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण काल उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले व नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, नगराध्यक्ष अनिता बोरकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य सिराज पठाण, व्यापारी संघटनेचे विवेक निरंकारी, नगरसेवक अशोक कंगाली, शहर विचार मंचचे जावेद शेख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिन्हा, डॉ. कटरे, आयपीएचएस समन्वयक प्रवीण गुटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन सुरू करण्यात आलेले हे डायलिसिस केंद्र अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असून प्रशिक्षित वैद्यकीय व तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यात येणार आहे. मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी नियमित डायलिसिस ही अत्यावश्यक उपचार पद्धती असल्याने या केंद्रामुळे अशा रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

या केंद्राच्या सुरूवातीमुळे कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्तरावरच सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, आर्थिक खर्च व हालअपेष्टा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

“महाडायलिसिस – स्वस्थ आरोग्याची हमी” हा उपक्रम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोफत किंवा परवडणाऱ्या दरात डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. कुरखेडा येथे सुरू झालेले हे केंद्र गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करणारे ठरणा असून “सर्वांसाठी आरोग्य” ही शासनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button