
घुग्घुस-ताडाली मार्गावर अपघात
चंद्रपूर : घुग्घुस-ताडाली मार्गावर साखरवाही गावाजवळ शुक्रवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरच्या भीषण धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे संपूर्ण भद्रावती तालुक्यात शोककळा पसरली आहे.
या अपघातात मयुर सुरेश लांबट (वय ३०) आणि ईश्वर गौतम वेळेकर (वय ३१) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर, मृत मयुर लांबट यांच्या पत्नी स्नेहल मयुर लांबट या गंभीर जखमी झाल्या.
भद्रावती तालुक्याचे रहिवासी असलेले मयुर लांबट हे पत्नी स्नेहल यांच्यासोबत घुग्घुसच्या दिशेने येत होते, तर ईश्वर वेळेकर हे चंद्रपूरहून भद्रावतीकडे जात होते. साखरवाही गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक बसली. या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्या स्नेहल लांबट यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक मयुर लांबट यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.



