गोंदियाविदर्भ

प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे – जिल्हाधिकारी प्रजित नायर

शौर्य दिन व सैनिक मेळावा साजरा

गोंदिया : देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्‍य दल कुठेही मागे नाही. आपले सैनिक सीमेवर देशाची सुरक्षा करतात, त्यामुळेच आपण सुरक्षीत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने देशसेवेसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित शौर्य दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी नायर म्हणाले, आपले सैनिक हे कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावतात. परकीय शक्तींपासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी आपला सैनिक सदैव तत्पर असतो. त्यामुळेच आपण सर्वजन सुरक्षीत आहोत. सैनिकांच्या वर्दीमध्ये ताकद असते. सैनिकांमध्ये शिस्तबध्दता असते. देशासाठी आपले कर्तव्य म्हणून आपण आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील म्हणाल्या, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक व माजी सैनिकांचे अवलंबितांनी कौशल्य विकास प्रशिक्षण जास्तीत जास्त संख्येने करावे. माजी सैनिक/ विधवा यांच्याकरीता लिगल मेडिकल क्लिनिक उघडण्यात आले आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी सैनिकांना पारिवारिक पेन्शन तसेच विविध प्रकारच्या सुविधाबद्दल विस्तृत माहिती दिली.

माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था तिरोडा यांनी पंजाब राज्यातील भीषण पूरस्थितीने बाधित नागरिकांना आर्थिक मदत म्हणून तहसिल स्तरावर सार्वजनिक रॅली काढून 70 हजार 680 रुपये रक्कम गोळा करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय गोंदियाच्या मार्फत पंजाब प्रशासनास पोच केले. या उत्कृष्ट कार्याकरीता जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी संस्थेस प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरवीत केले.

कार्यक्रमास जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिकांचे अवलंबित, मनोहरभाई पटेल मिलिट्री स्कुल गोंदिया येथील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सैनिक गणेश बिसेन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button