
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाद्वारे मदत स्वीकारणार ; वैद्यकीय सेवा शिबिरांवर भर
गोंदिया : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीने बाधित झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी जिल्ह्यातील दानदात्यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पूरग्रस्त बाधितांना मदत करण्यासाठी सर्व शासकीय विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. बाधित क्षेत्रांमध्ये विविध मदतीसोबतच वैद्यकीय मदत देखील आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. हा कक्ष विविध शासकीय, खासगी रुग्णालये आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवा शिबिरे तसेच औषधी, अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तूंचे संकलन व गरजूंपर्यंत वाटप करण्याचे काम करत आहे.
जिल्ह्यातील दानदात्यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी सहाय्यता करण्यात पुढाकार घ्यावा. इच्छुक दानदात्यांनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख डॉ. मुकेश येरेपुडे (मोबाईल: ९५१८९८४२९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



