
माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांची गंभीर दखल ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
अहेरी : अहेरी तालुक्यातील साकीनगट्टा येथील अंगणवाडी केंद्रात गरोदर माता आणि बालकांना पुरवण्यात येणारा पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा आहार ‘किड व बुरशी’युक्त असून, काही पॅकेट्समध्ये तर चक्क ‘अळ्या’ पडल्याचे निष्पन्न झाले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई अटळ असल्याचा इशारा दिला आहे.
साकीनगट्टा येथील नागरिकांनी आणि वारलू दादा यांनी थेट दूरध्वनीद्वारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांना ही गंभीर माहिती दिली. तक्रार मिळताच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरीच्या माजी अध्यक्षांना तात्काळ गावात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी तातडीने साकीनगट्टा येथे धाव घेऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आणि निकृष्ट आहाराचा पंचनामा केला.
यावेळी त्यांनी थेट भाग्यश्री आत्राम यांच्याशी फोनवरून संपर्क साधून गावकरी आणि नागरिकांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले, जेणेकरून परिस्थितीची गांभीर्य लक्षात येईल. पाहणीदरम्यान अंगणवाडी सेविकेकडून धक्कादायक माहिती समोर आली. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी पुरवण्यात आलेले धान्य, डाळ, गहू, तांदूळ या वस्तूंना किड व बुरशी लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, अहेरी यांनी सकाळी पाहणी केली असता, चार महिन्यांपूर्वीचा शिल्लक असलेला आहार — वटाणा, तांदूळ, गहू, डाळ, तेल, तिखट, मीठ आणि हळद याची पॅकेट्स मुदतबाह्य (Expired) असल्याचे स्पष्ट झाले. (ऑक्टोबर महिन्याचा आहार मात्र व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले.)
या गंभीर प्रकारावर भाग्यश्री आत्राम यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गरोदर महिला आणि बालकांना दिला जाणारा आहार जर निकृष्ट दर्जाचा असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. दोषी पुरवठादार किंवा अधिकारी कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणाची त्या स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याशी संपर्क साधून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अहेरी या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करून लवकरच CEO यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहे.



