भंडाराविदर्भ

वरठी येथे किरण लोकसंचालित साधन केंद्राची १४ वी वार्षिक सभा उत्साहात

महिलांना शासकीय योजनांची माहिती ; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगिनींचा गौरव

भंडारा : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली किरण लोकसंचालित साधन केंद्राची (CMRC) १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वरठी येथील ग्रामपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगिनींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माविम, भंडाराच्या उपव्यवस्थापक तथा CMRC सल्लागार संगीता भोंगडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माया वैद्य होत्या, तर जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ, जिल्हा व्यवस्थापक ओबीसी महामंडळ विशाखा फडणवीस आणि कृषी अधिकारी एम. डी. डोंगरवर, HDFC बँकेचे मेश्राम, ICICI बँकेचे सचिन मदणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संगीता भोंगडे यांनी महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली आणि अडचणी आल्यास थेट तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. विशाखा फडणवीस यांनी ओबीसी महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आणि कृषी अधिकारी डोंगरवर यांनी कृषी विभागामार्फतच्या योजना स्पष्ट केल्या.

HDFC बँक आणि ICICI बँकेमार्फत लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहयोगिनी, लेखापाल व उपजीविका सल्लागार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच, काथा वर्क करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक गौतम शहारे यांनी केले, तर सचिव वैशाली खांदाळे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्मिता रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्मिता वाहने यांनी केले. सभेला CMRC अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, RGB सदस्य तसेच विविध स्वयं सहाय्यता गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button