भंडाराविदर्भ

रोजगार मेळाव्यात ५२८ रिक्त पदांसाठी मुलाखती ; ७६ उमेदवारांची प्राथमिक निवड

भंडारा : जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शिव कलश बहुउद्देशीय संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संतकृपा सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात एकूण ५२८ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या, ज्यात ७६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या रोजगार मेळाव्यात ९ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या, ज्यात SIS Security, Tata Strive, SBI Life Insurance, MMP Industries Ltd, The Universal Group आणि LIC यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. मेळाव्यात एकूण २५४ उमेदवारांनी नोंदणी केली होती (१५० पुरुष, १०४ महिला). प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या ११८ उमेदवारांपैकी सर्व ११८ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीनंतर ७६ उमेदवारांची विविध पदांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली.

यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांसारख्या स्वयंरोजगार विषयक ५ महामंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या योजनांची माहिती घेण्यासाठी १०९ उमेदवारांनी भेट दिली.

मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त, यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “उमेदवारांनी सुरुवातीला कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची उंच शिखरे गाठावीत. खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.” त्यांनी उमेदवारांना स्वयंरोजगार महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रामभाऊ चाचेरे, डॉ. सुरेश केजलकर, संतोष मदनकर (अध्यक्ष, शिव कलश संस्था), विजय पांडव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button