गडचिरोलीविदर्भ

‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत १२० युवक-युवतींनी घेतले चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण

‘दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील तरुणांना रोजगाराची संधी ; प्रमाणपत्र वाटप सोहळा संपन्न

गडचिरोली : जिल्ह्यातील माओवादग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना स्वावलंबी बनवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबवलेला ‘प्रोजेक्ट उडान’ मैलाचा दगड ठरत आहे. ‘दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२० प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ बुधवारी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे उत्साहात पार पडला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, स्किलिंग इन्स्टिट्यूट (पोलीस अधीक्षक कार्यालय) आणि कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियाना’ अंतर्गत हे प्रशिक्षण राबविण्यात आले. ०२ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये अतिदुर्गम भामरागड, अहेरी, एटापल्ली व हेडरी येथील एकूण १२० (महिला व पुरुष) प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना लर्निंग परवाना (Learning License) देण्यात आला असून, लवकरच त्यांना कायमस्वरूपी परवानाही मिळवून दिला जाणार आहे.

स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आजवर जिल्ह्यातील एकूण १०१० युवक-युवतींना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्यात आले आहे. निरोप समारंभात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button