
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील विक्रेत्याना नोटीस बजावत तत्काळ अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा पोलिस कारवाईसह 20 हजारांचा दंड वसूल करण्याचा इशारा ग्रामपंचायत समिती, तंटामुक्त समितीने दिला आहे.
गावात मागील सहा महिन्यांपासून अवैध दारूविक्री सुरू असल्याने व्यसनाचे प्रमाण वाढले होते. नुकतेच गावात मुक्तीपथतर्फे सघन भेट कार्यक्रम घेत ग्रामस्थांना अवैध दारूविरोधात जागृत करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात सभा घेऊन दारूविक्री बंदीचा ठराव घेऊन विक्रेत्यांना धडा शिकविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार गावातील ग्रामपंचायत समिती, तंटामुक्त समिती, गाव संघटना व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या गावातील सात दारू विक्रत्यांच्या घरोघरी भेट देऊन चर्चा केली तसेच गावाच्या निर्णयाची माहिती देत अवैध दारूविक्री तत्काळ थांबवा, अन्यथा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल सोबतच 20 हजारांचा दंड वसूल करण्याचा इशारा दिला. या निर्णयामुळे सद्यस्थितीत गावातून अवैध दारूविक्री बंद झाली आहे.
यावेळी सरपंच भैय्याजी वाढई, तमूस अध्यक्ष प्रशांत वाढई, पोलिस पाटील, गाव संघटनेचे अर्चना मडावी, जीवनकला कुमारे, माया सरवर, निळा गावडे, मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



