क्राईमनागपूरविदर्भ

चार हजाराची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपीक व सहायक परिवहन अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

ओव्हरलोड ट्रक सोडवण्यासाठी पाच हजाराची मागणी ; अधिकाऱ्याकडे आढळली ६५ हजारांची रोख रक्कम 

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), नागपूर ग्रामीण येथील भ्रष्टाचार उघडकीस आणत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) नागपूरने १७ ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. गिट्टीने भरलेला ओव्हरलोड ट्रक सोडवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक आणि सहायक परिवहन अधिकारी अशा दोन लोकसेवकांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांच्या ओव्हरलोड ट्रकवर आरटीओने ५०,७५०/- रु. चा दंड (चालान) ठोठावला होता. हा ट्रक क्रॉसींग न करता सोडवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीण येथे कनिष्ठ लिपीक मोहन दिवटे यांनी सुरुवातीला ५०००/- रु. लाचेची मागणी केली होती. या तक्रारीच्या आधारावर एसीबी, नागपूरच्या पथकाने सापळा रचला. सापळा पडताळणी दरम्यान, तक्रारदार हे चालान रक्कम भरून ट्रक सोडण्यासाठी कनिष्ठ लिपीक मोहन दिवटे आणि सहायक परिवहन अधिकारी श्री. अनुप सानप यांना भेटले. यावेळी दोघांनीही ओव्हरलोड ट्रक क्रॉसींग न करता गिट्टीसह सोडविण्यासाठी ५०००/- रु. लाचेची मागणी केली. तडजोडीअंती कनिष्ठ लिपीक मोहन दिवटे यांनी ४०००/- रू. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत दोन्ही आरोपी लोकसेवक रंगेहाथ पकडण्यात आले आहेत.

या कारवाई दरम्यान, आरोपींची अंगझडती घेतली असता, सहायक परिवहन अधिकारी अनुप सानप यांच्या पॅन्टच्या खिश्यात चक्क नगदी ६५,३५०/- रु. आणि कनिष्ठ लिपीक मोहन दिवटे यांच्या खिश्यात २,५००/- रु. नगदी रोख रक्कम मिळून आली, जी जप्त करण्यात आली आहे. दोन्ही लोकसेवकांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आर्थिक फायद्यासाठी लाच मागितल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कपीलनगर, नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, व अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर, एसीबी नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजकिरण येवले व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसम (एजंट) यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button