क्राईमचंद्रपूरविदर्भ

१२ लाखांचा बनावट देशी दारूसाठा जप्त

गोंडपिंपरी पोलिसांची कारवाई ; गोंडपिंपरी-आष्टी मार्गावर वाहन सोडून तस्कर फरार

गोंडपिंपरी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढवलेल्या गोंडपिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर) रात्री उशिरा गोंडपिंपरी-आष्टी मार्गावर मोठी कारवाई केली आहे. एका वाहनातून तब्बल १२ लाख रुपये किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस येत असल्याचे पाहून आरोपी चालक आणि तस्कर घटनास्थळावरून पळून गेले. शनिवारी (दि. १८) दारूचे नमुने तपासल्यानंतर हा साठा बनावट असल्याचे सिद्ध झाले, अशी माहिती ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी दिली.

गोंडपिंपरी-आष्टी मार्गावरून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी सुरू असल्याची माहिती ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिस पथक आष्टीकडे रवाना झाले. रात्री ११ वाजता एमएच ३० केएफ ४६५६ क्रमांकाचे वाहन रस्त्यावर आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १२ लाख रुपये किमतीचा अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. ही दारू गडचिरोली जिल्ह्यात जात होती. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच आरोपी व चालक घटनास्थळावरून वाहन सोडून फरार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे करत आहेत.

या कारवाईनंतर गोंडपिंपरी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, सर्व वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. या तस्करीच्या रॅकेटचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. कारवाईत पोलिस जवान वंदिराम पाल, शांत नैताम, अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार आदींचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button